
परभणी, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील भूमिहीन, दारिद्र्यरेषेखालील शेतमजुरांना ०४ एकर कोरडवाहू किंवा ०२ एकर बागायती शेतजमीन देण्यात येते.
शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतजमिनीसाठी प्रति एकर ५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत, तर बागायती शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर ८ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत जिल्हास्तरीय समितीमार्फत वाटाघाटी करून शेतजमीन विक्रीचा मोबदला दिला जातो.
त्याअनुषंगाने परभणी जिल्ह्यातील शेतजमीन विक्री करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी अथवा व्यक्तींनी प्रस्तावासोबत विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ उतारा, नमुना ८-अ, १०० रुपयांच्या बाँड पेपरवरील नोटरीसह विहित नमुन्यातील शपथपत्र, भूमी अभिलेख कार्यालयाचा पोटहिस्सा मोजणी अहवाल, निर्विवाद प्रमाणपत्र (तलाठी यांचे), मूल्यांकन प्रमाणपत्र, बँकेचे बेबाकी प्रमाणपत्र, कुटुंबातील सदस्यांचे नाहरकत प्रमाणपत्र, मागील १३ वर्षांतील फेरफार संबंधित पुरावे आदी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज लवकरात लवकर सहायक आयुक्त, समाज कल्याण, परभणी कार्यालयाकडे शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जाचा नमुना, शपथपत्रांचे नमुने तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण आर. एच. एडके यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis