वलगाव पोलिस ठाण्यात जनजागृती बैठक
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन अमरावती, ७ ऑगस्ट (हिं.स.) : ग्रामीण भागात ''चोर आले'' अशा अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर वलगाव पोलिसांनी जनजागृती व समन्वय बैठक आयोजित करून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाह
वलगाव पोलिस ठाण्यात बैठकीला उपस्थित नागरिक. वलगाव ठाण्यात जनजागृतीबाबत बैठक


अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

अमरावती, ७ ऑगस्ट (हिं.स.) : ग्रामीण भागात 'चोर आले' अशा अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर वलगाव पोलिसांनी जनजागृती व समन्वय बैठक आयोजित करून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.या बैठकीला पोलिस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, ग्रामसुरक्षा दलाचे प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रीता उईके यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता तत्काळ वलगाव पोलिस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. तसेच सोशल मीडियावर कोणतीही अप्रमाणित किंवा अस्पष्ट माहिती प्रसारित करणे हा दंडनीय गुन्हा असून, अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सहायक पोलिस निरीक्षक अशोक शिर्के यांनी ग्रामसुरक्षा दल सक्रिय ठेवून पोलिसांशी सातत्याने समन्वय राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे समन्वयन पोलिस हेडकॉन्स्टेबल नीलेश घाटे यांनी केले.

बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी गावागावांत जनजागृती करून अफवा रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सक्रिय सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande