
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।गोदावरी नदीला गतवर्षी आलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा आणि शासकीय नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी नदीच्या महापुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत आणि पिकविमा नुकसानभरपाई पात्र शेतकऱ्यांना त्वरित वितरित करण्यात यावी.
महापुरानंतर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारची मदत जाहीर केली होती. त्यामध्ये कोरडवाहू (जिराईत) पिकांसाठी प्रतिहेक्टर १८ हजार ५०० रुपये, हंगामी बागायती पिकांसाठी २७ हजार रुपये, कायमस्वरूपी बागायती पिकांसाठी ३२ हजार ५०० रुपये, जमीन वाहून गेल्यास प्रतिहेक्टर ४७ हजार रुपयांची मदत, मनरेगा अंतर्गत जमीन सुधारणा, पेरणीसाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत, जनावरांच्या मृत्यूसाठी प्रतिजनावर ३२ हजार रुपये तसेच गाळ साचलेल्या किंवा खचलेल्या विहिरींच्या स्वच्छतेसाठी ३० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने पंचनामे झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंबड तालुक्यात अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी नियमानुसार नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे पूर्वसूचनाही दिल्या आहेत. मात्र अद्याप पिकविम्याची नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ आणि गंगाखेड येथील महापुरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि पिकविम्याचा लाभ देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर अंबड तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांतील बाधित शेतकऱ्यांनाही तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis