तळवली अपघातात दिव्यांग जखमी; श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची तत्पर सेवा
रायगड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत-खोपोली राज्य महामार्ग (क्र. ४४८) वरील तळवली गावाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात आपटी (ता. खालापूर) येथील दिव्यांग दीपक पाटील हे गंभीर जखमी झाले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी यांच
Differently-abled person injured in Talavali accident;


रायगड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत-खोपोली राज्य महामार्ग (क्र. ४४८) वरील तळवली गावाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात आपटी (ता. खालापूर) येथील दिव्यांग दीपक पाटील हे गंभीर जखमी झाले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी यांच्या रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे त्यांना तातडीने खोपोली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पाटील हे त्यांच्या तीन चाकी स्कूटरवरून पळसदरीमार्गे आपटीकडे जात होते. ते तळवली गावाजवळ काही कारणास्तव थांबले असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना प्राथमिक मदत केली. त्याचवेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी यांच्या रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. रुग्णवाहिकेचे चालक दत्तात्रेय (दादू) दरेकर यांनी तत्परता दाखवत काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून दीपक पाटील यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी सागर रणदिवे, राजू भुते तसेच स्थानिक नागरिकांनी मदतकार्यात मोलाचे सहकार्य केले.

स्थानिकांच्या मते, कर्जत-खोपोली राज्य महामार्गावर वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. विशेषतः दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत असून वेगमर्यादा नियंत्रण, इशारा फलक, रिफ्लेक्टर आणि अन्य सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, दीपक पाटील यांच्यावर संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या रुग्णवाहिका सेवेच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande