
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR 2026) मोहिमेला जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 32 लाख 16 हजार 167 मतदारांपैकी 30 लाख 96 हजार 631 (96.28 टक्के) मतदारांना गणना (Enumeration) अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे. तसेच प्राप्त अर्जांपैकी 25 लाख 3 हजार 432 (77.84 टक्के) अर्जांचे डिजिटायझेशनही पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाधिक मतदारांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गणना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 8 ऑगस्ट 2026 ऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या मतदारांनी अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडे गृहभेटीदरम्यान अथवा थेट अर्ज जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगतीनुसार वैजापूर विधानसभा मतदारसंघात 100 टक्के गणना अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे. डिजिटायझेशनमध्ये कन्नड (90.77 टक्के) आणि वैजापूर (90.79 टक्के) हे मतदारसंघ आघाडीवर आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय अर्ज वितरण व डिजिटायझेशनची प्रगती
पुढीलप्रमाणे आहे :
सिल्लोड – अर्ज वितरण 99.83 टक्के, डिजिटायझेशन 85.71 टक्के
कन्नड -अर्ज वितरण 99.89 टक्के, डिजिटायझेशन 90.77 टक्के
फुलंब्री - अर्ज वितरण 96.65 टक्के, डिजिटायझेशन 77.33 टक्के
औरंगाबाद (मध्य) - अर्ज वितरण 93.24 टक्के, डिजिटायझेशन 62.43 टक्के
औरंगाबाद (पश्चिम) - अर्ज वितरण 90.33 टक्के, डिजिटायझेशन 67.35 टक्के
औरंगाबाद (पूर्व) -अर्ज वितरण 88.90 टक्के, डिजिटायझेशन 62.63 टक्के
पैठण -अर्ज वितरण 99.40 टक्के, डिजिटायझेशन 85.50 टक्के
गंगापूर - अर्ज वितरण 99.85 टक्के, डिजिटायझेशन 82.55 टक्के
वैजापूर - अर्ज वितरण 100 टक्के, डिजिटायझेशन 90.79 टक्के
जिल्ह्यातील 3,264 बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरभेटीद्वारे गणना अर्जांचे वितरण, पडताळणी तसेच अर्ज संकलनाचे काम युद्धपातळीवर करीत आहेत.
जिल्हा निवडणूक कार्यालयाने सर्व पात्र मतदारांना आवाहन केले आहे की, 17 ऑगस्ट 2026 या वाढीव मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह गणना अर्ज संबंधित BLO यांच्याकडे सादर करावा. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत अचूक व अद्ययावत राहण्यासाठी नागरिकांनी या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis