
डोंबिवली, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर, संघटनात्मक बांधणीवर आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना (शिंदे गट) येथील युवा व महिला कार्यकर्त्यांसह बंगाली समाजातील अनेक मान्यवरांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात केडीएमसीचे उपमहापौर राहुल दामले, नगरसेविका शारदा प्रदीप चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नंदकिशोर परब यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत पक्षाची संघटनात्मक बांधणी टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानुसार विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवणारे काही कार्यकर्तेही आता भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केला. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या धोरणांवर विश्वास असल्यामुळे हा पक्षप्रवेश होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपमहापौर राहुल दामले यांनी हा पक्षप्रवेश कोणताही राजकीय धक्का नसून भाजपच्या नेतृत्वावर आणि कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या न्यायावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळते, त्यामुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेविका शारदा प्रदीप चौधरी यांनी भाजपची प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः ही विचारसरणी नागरिकांना भावत असल्याचे सांगितले. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न पुढेही सुरू ठेवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, संघटन सरचिटणीस रवि सिंग ठाकूर, सरचिटणीस निखिल चव्हाण, नगरसेविका रंजना पेणकर, सरचिटणीस प्रकाश (बाळा) पवार, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुमित चौधरी यांच्यासह मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi