
प्रारूप यादी २४ ऑगस्ट, अंतिम यादी २७ ऑक्टोबरला
अमरावती, ७ ऑगस्ट (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, १७ ऑगस्टपर्यंत मतदारांच्या गणना अर्जांची नोंदणी, घरभेटी आणि डीजीटायझेशनची प्रक्रिया सुरू राहणार असून, २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत ३० जूनपासून सुरू असलेली घरोघरी भेट मोहीम आता १७ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. याच कालावधीत मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचनेचे कामही पूर्ण केले जाणार आहे.
गणना अर्जांचे डीजीटायझेशन पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेली प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे-हरकतींवरील सुनावणी व त्यांचा निपटारा २४ ऑगस्टपासून २२ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
सध्याच्या मतदार यादीनुसार, अमरावती जिल्ह्यात एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत २१ लाख ३७ हजार १७२ म्हणजेच ८३.८५ टक्के मतदारांचे गणना अर्ज प्राप्त झाले असून, त्यांचे डीजीटायझेशनही पूर्ण झाले आहे.
दरम्यान, पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान १ लाख ३६ हजार ५०८ मतदार कायमस्वरूपी जिल्ह्याबाहेर गेल्याचे आढळून आले आहे. तसेच १ लाख ३ हजार ४०२ मतदार मृत झाल्याची नोंद आहे, तर ४२ हजार २१७ मतदारांची नावे दोन ठिकाणी असल्याचे आढळले आहे. घरभेटीदरम्यान वारंवार संपर्क करूनही ११ हजार २१७ मतदार सापडले नाहीत. याशिवाय ९३३ मतदारांच्या नोंदींमध्ये विविध अनियमितता आढळून आल्या असून, अशा नावांचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी