डोंबिवली विभागीय कार्यालयातील अनागोंदीमुळे आरोग्याचा प्रश्न
डोंबिवली, 07 ऑगस्ट (हिं.स.)। (आवार बनले कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक घोषित झाल्याने ती रिकामी करण्यात आली असली, तरी कार्यालयाचे आवार सध्या जप्त साहित्याच्या ढिगाऱ्याने भरल
Ph02


डोंबिवली, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

(आवार बनले कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड )

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक घोषित झाल्याने ती रिकामी करण्यात आली असली, तरी कार्यालयाचे आवार सध्या जप्त साहित्याच्या ढिगाऱ्याने भरल्याने कचऱ्याच्या डंपिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. महापालिकेने कारवाईत जप्त केलेली मोडकळीस आलेली वाहने, फलक आणि इतर साहित्य पार्किंगच्या जागेतच अस्ताव्यस्त टाकल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहनतळाचा वापर करणेही अवघड झाले आहे.

अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था आहे. महापालिकेच्या सुरक्षा विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन जप्त साहित्य हटविण्याची सूचना केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांनी शहरातील राडारोडा व कचरा हटविण्याचे आदेश दिले असताना महापालिकेच्याच विभागीय कार्यालयाच्या आवारात जप्त साहित्याचा डोंगर साचल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पत्रकारांनी अनेकदा हा विषय निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. १५ ऑगस्टपूर्वी परिसराची साफसफाई केली जाईल असे सुरक्षा विभागाकडून सांगण्यात येत असल्याची माहिती आहे.

पावसाळ्यात आवारात पाणी साचत असल्याने डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे जप्त साहित्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा, पार्किंग व्यवस्था सुरळीत करावी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालिका कर्मचारी, पत्रकार आणि नागरिकांकडून होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande