
लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत स्थापन जय हिंद लोकसंचालित साधन केंद्राची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महादेव पार्वती मंगल कार्यालय येथे उत्साहात झाली. सभेत महिला सक्षमीकरण, बचत गटांची प्रगती आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
सभेस माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे, कोमल भारती, बालग्रामचे नंदा पितांबर, डॉ. प्रभावती वाडकर, भरत काळे, उद्धव तेलंग, नगरसेवक दत्ता सुरवसे, गजानन साळुंके आदी उपस्थित होते.
आरोग्य सहायक उद्धव तेलंग यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार व ‘आभा’ कार्डाबाबत माहिती दिली. नंदा पितांबर यांनी ग्रामीण बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे सांगितले. भरत काळे यांनी महिलांनी कर्जाचा योग्य वापर उद्योग-व्यवसायासाठी करावा, असे प्रतिपादन केले.
डॉ. प्रभावती वाडकर यांनी महिला धोरणामुळे झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. दत्ता सुरवसे यांनी महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू केल्याचे नमूद केले. सोमनाथ लामगुंडे यांनी बचत गटांना १ ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होत असून परतफेडीचे प्रमाण ९९ टक्के असल्याचे सांगितले.
यावेळी उत्कृष्ट उद्योग करणाऱ्या महिलांसह सीआरपी, माविम मित्र मंडळ व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis