लातूर पोलिसांचा आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीवर घाव; ४१ गुन्हे उघडकीस, तिघे जेरबंद
लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर - २४, तर बीड, जालना, नांदेड व हिंगोलीतील १७ गुन्ह्यांचा समावेश; २४ लाख ६८ हजारांची रोकड जप्त शेतकऱ्यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची चोरी, कत्तल आणि मांसविक्री करणाऱ्या आंतरराज्यीय जनावरे च
पोलीस कारवाई


लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

लातूर - २४, तर बीड, जालना, नांदेड व हिंगोलीतील १७ गुन्ह्यांचा समावेश; २४ लाख ६८ हजारांची रोकड जप्त

शेतकऱ्यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची चोरी, कत्तल आणि मांसविक्री करणाऱ्या आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीचा लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत परभणी जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यातील २४ आणि बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ असे तब्बल ४१ जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून २४ लाख ६८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती संकलन, संशयितांवर पाळत तसेच विविध जिल्ह्यांमध्ये गोपनीय तपास करत टोळीचा माग काढला.

पिकअपमधून पळण्याचा प्रयत्न; तिघे पोलिसांच्या ताब्यात

दि. ६ ऑगस्ट रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, किनगाव ते पिंपळखेड रस्त्यावरील शिरसाठवाडी फाटा परिसरात जनावरे चोरी करणारे काही आरोपी हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगारांसह व्यवहारासाठी जमले आहेत. माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी परिसराला वेढा घालताच संशयितांनी पिकअप वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून परभणी जिल्ह्यातील तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अतिक सुलतान कुरेशी (गंगाखेड, जि. परभणी), मुजाहिद बाबू खाटीक (परभणी) आणि साजू गफार कुरेशी (पालम, जि. परभणी) यांचा समावेश आहे.

या टोळीतील नियाज उर्फ महंमद नवाब आणि आस मोहम्मद सिरदार, दोघेही हरियाणा, यांच्यासह हरियाणा राज्यातील अन्य चार साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

चौकशीत ४१ गुन्ह्यांची कबुली

प्राथमिक चौकशीत आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि विविध गुन्ह्यांतील तपशील समोर ठेवल्यानंतर आरोपींनी जनावरे चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींनी लातूर, बीड, जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील विविध गावांमधून बैल, गायी, म्हशी, वासरे आदी जनावरे चोरी केली. त्यानंतर त्यांची कत्तल करून मांस विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैसे कमावल्याचे तपासात समोर आले आहे.

लातूर जिल्ह्यातील २४ गुन्ह्यांमध्ये रेणापूर, जळकोट, लातूर ग्रामीण, उदगीर ग्रामीण, चाकूर, किनगाव, अहमदपूर, औसा आणि कार्ला शिरसी आदी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय बीड, जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील आणखी १७ जनावरे चोरीचे गुन्हे आरोपींनी कबूल केले असून, संबंधित पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

एकाच कारवाईत ४१ गुन्ह्यांची उकल झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईला मोठे यश मानले जात आहे.

मांसविक्रीतून मिळालेली २४ लाखांची रोकड जप्त

आरोपींकडून जप्त करण्यात आलेली २४ लाख ६८ हजार रुपयांची रोकड जनावरे चोरी करून त्यांच्या मांसविक्रीतून मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या रकमेचा पंचनामा करून ती विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आली आहे.

जनावरे चोरीच्या घटनांमुळे अनेक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यासह या टोळीच्या अन्य गुन्हेगारी कारवायांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande