
बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। विधानमंडळाच्या अंदाज समितीची सदस्य या नात्याने आमदार नमीता मुंदडा यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषी, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, उद्योग, नगरविकास, सहकार, नियोजन आदी विभागांच्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, निधीचा परिणामकारक वापर, सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि प्रलंबित कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. असे त्यांनी सांगितले
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीस उपस्थित राहून प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील विविध विकासप्रकल्पांना अधिक गती देणे, कामांचा दर्जा कायम ठेवणे, निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करणे आणि शासनाच्या लोकहितकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, स्थानिक स्तरावरील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांमधील अडथळे तातडीने दूर करून प्रशासनाने अधिक समन्वयाने व उत्तरदायित्वाने कार्य करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या प्रत्येक रुपयाचा पारदर्शक, परिणामकारक आणि लोकाभिमुख पद्धतीने उपयोग होईल, यासाठी अंदाज समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल.
याप्रसंगी विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis