
सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना या मार्गावरील नव्याने उभारण्यात आलेला पाच किलोमीटरचा सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या १५ दिवसांत फोडण्याची वेळ आली आहे.
भूमिगत जलवाहिन्या, पाणीपुरवठ्याच्या मुख्य वाहिन्या आणि ड्रेनेजची कामे पूर्ण करण्याबाबत महापालिकेने 'एमएसआयडीसी'ला तीन वेळा लेखी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. आता रस्ता खोदून आवश्यक कामे करावी लागणार असून, त्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे.होटगी रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामास दीड महिन्यापूर्वी सुरुवात झाली होती. काम सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने भूमिगत जलवाहिन्या, पाणीपुरवठा व्यवस्था आणि ड्रेनेज चेंबर्सची कामे पूर्ण करण्याची गरज 'एमएसआयडीसी'च्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर २ जुलै आणि १७ जुलै रोजीही स्वतंत्र स्मरणपत्रे पाठवून जलवाहिनी क्रॉसिंग आणि ड्रेनेजशी संबंधित कामे पूर्ण करण्याची आठवण करून देण्यात आली होती. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरूच ठेवण्यात आले.महापालिका आणि 'एमएसआयडीसी'च्या संयुक्त पाहणीत आसरा चौक परिसरातील १८ इंची, २० इंची तसेच गोदूताई घरकुल योजनेची मुख्य जलवाहिनी नव्या काँक्रीट रस्त्याखाली अडकल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय ड्रेनेजची तब्बल १८ चेंबर्सही बुजल्याचे निदर्शनास आले आहे.महिला हॉस्पिटलकडून विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाच्या उजव्या बाजूला दाट लोकवस्ती असून मुख्य जलवाहिनी डाव्या बाजूला आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या ठिकाणी जलवाहिनीचे क्रॉसिंग करणे अपरिहार्य असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी नव्याने तयार झालेला काँक्रीट रस्ता खोदावा लागणार असून, त्यावर सुमारे नऊ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे. त्यामुळे नियोजनातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड