राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची बदनापूर येथील कृषि विज्ञान केंद्र भेट व पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.) । महाराष्ट्र राज्याचे कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन तसेच विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), बदनापूर येथे
अ


छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.) । महाराष्ट्र राज्याचे कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन तसेच विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), बदनापूर येथे भेट देऊन बायोमिक्स लॅबोरेटरी, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल तसेच कृषी संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जैविक शेती, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत कृषी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

राज्यमंत्री जयस्वाल यांनी सर्वप्रथम केव्हीके बदनापूर येथील बायोमिक्स लॅबोरेटरीला भेट देऊन तेथे तयार करण्यात येणाऱ्या विविध जैविक उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. द्रवरूप जैविक खतांचे उत्पादन, त्यांचे दरपत्रक, गुणवत्ता नियंत्रण आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा होणारा उपयोग याबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. जैविक खतांच्या वापरामुळे मातीची सुपीकता व आरोग्य सुधारण्यास मदत होते, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते, उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढतो, असे सांगण्यात आले. या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.यानंतर त्यांनी माती परीक्षण प्रयोगशाळेला भेट देऊन माती आरोग्य पत्रिका तयार करण्याची प्रक्रिया, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शिफारशींची माहिती घेतली. कृषी प्रदर्शन स्टॉलवरील विविध जैविक उत्पादने, विस्तार साहित्य, सुधारित कृषी तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन ही उत्पादने व तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील जंगली जातींच्या संवर्धित बागेलाही भेट दिली. केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेल्या आणि शेतकऱ्यांमध्ये प्रसारित होत असलेल्या कडधान्य पिकांच्या सुधारित वाणांची त्यांनी माहिती जाणून घेतली. विशेषतः तूर पिकातील ‘गोदावरी’ वाण तसेच हरभरा पिकातील ‘परभणी चना-१६’ या सुधारित वाणांच्या वैशिष्ट्यांबाबत त्यांनी शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली. तूर, मुग व उडीद पिकांच्या जंगली जातींचे संवर्धन, त्यांचे जनुकीय महत्त्व आणि भविष्यातील सुधारित वाण विकसित करण्यामधील त्यांचे योगदान याविषयीही त्यांनी माहिती घेतली.भेटीदरम्यान राज्यमंत्र्यांनी कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कृषी संशोधन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवोन्मेष, जैविक शेती आणि कृषी क्षेत्रातील उदयोन्मुख संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संशोधनाधिष्ठित शेतीचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि महाविद्यालय, बदनापूरचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, डॉ. एस. बी. पवार, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. गजेंद्र जगताप, कृषि विज्ञान केंद्र, बदनापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सचिनकुमार दिगंबरराव सोमवंशी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. सचिन रामचंद्र धांडगे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. राहुल लक्ष्मणराव कदम, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) डॉ. दिपाली रमेश कांबळे, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) प्रा. फारुक रुबाब तडवी तसेच कृषी संशोधन केंद्र, बदनापूरचे डॉ. प्रशांत सोनटक्के, डॉ. विष्णू गीते, डॉ. प्रशांत पगार, डॉ. नितीन पतंगे यांच्यासह इतर शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित शास्त्रज्ञांनी विविध संशोधन प्रकल्प, जैविक खत निर्मिती, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि कृषी विस्तार उपक्रमांची सविस्तर माहिती राज्यमंत्र्यांना दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande