
जागतिक बँक, 'मित्रा' आणि जिल्हा प्रशासनाची उच्चस्तरीय बैठककुंभमेळ्यापूर्वी अत्याधुनिक डीईओसी उभारणारमोबाईल व फील्ड डीईओसीसह डिजिटल आपत्ती व्यवस्थापन प्रणाली;
नाशिक, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
, : आगामी सिंहस्थ कुंभमेळा, नैसर्गिक आपत्तींची वाढती तीव्रता आणि बदलते हवामान यांचा विचार करून नाशिक जिल्ह्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'मित्रा' (MITRA), जागतिक बँक आणि राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाच्या प्रतिनिधींसमवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अत्याधुनिक जिल्हा आपत्कालीन संचालन केंद्र (DEOC), मोबाईल डीईओसी, फील्ड डीईओसी, डिजिटल समन्वय प्रणाली आणि कुंभमेळ्यासाठी स्मार्ट आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
'मित्रा' संस्थेच्या महाराष्ट्र रेझिलिअन्स अँड डिझास्टर प्रोजेक्ट (MRDP) अंतर्गत नाशिकमध्ये अत्याधुनिक जिल्हा आपत्कालीन संचालन केंद्र (DEOC) उभारण्यात येणार असून, ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आपत्तीच्या काळात सर्व विभागांमध्ये जलद, समन्वयित आणि तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया राबविणे शक्य होणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आंतरविभागीय समन्वय (Interdepartmental Convergence) वाढविणे, डीईओसीच्या कार्यासाठी मानक संचालन प्रक्रिया (SOPs) तयार करणे तसेच IDRN, ICT आणि IEMS या आधुनिक डिजिटल प्रणालींचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, संसाधने आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचे रिअल-टाइम व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे.आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी त्वरित निर्णय घेण्यासाठी मोबाईल डीईओसी कार्यान्वित करण्यात येणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे फील्ड डीईओसी उभारण्यात येणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक स्तरावर जलद प्रतिसाद देणे आणि बचावकार्य अधिक परिणामकारकपणे राबविणे शक्य होणार आहे.
बैठकीत सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि पेठ या तालुक्यांतील भूकंपाच्या हालचालींचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे तैनात करण्यावर भर देण्यात आला. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भूकंपरोधक स्थानिक बांधकाम साहित्याचा वापर वाढविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय हवामान विभागाच्या (IMD) हवामान अंदाज प्रणालीचे API एकत्रीकरण करण्यात येणार आहे. हवामानातील बदलांची अचूक माहिती मिळाल्याने गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन नियोजन आणि आपत्तीपूर्व तयारी अधिक सक्षम होणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी समन्वय आणि सक्षम पूर्वतयारी यांच्या बळावर नाशिक जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांच्या जीवित आणि वित्तहानीचे प्रमाण कमीत कमी ठेवणे हेच आमचे सर्वोच्च ध्येय आहे.या बैठकीस जागतिक बँकेचे प्रतिनिधी अनुप करंथ, 'मित्रा' (PMU) चे प्रतिनिधी होसाळीकर व श्रीनाथ, PMTC (R&R) विभागाच्या कांचन सबनीस, अंकित मोहाबंसी, रोहित कुसळकर, अमलनाथ कावुलुरू, डेस्क अधिकारी स्मिता बागुल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहितकुमार राजपूत, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI