परभणी : जैवविविधता संरक्षणासाठी देशी बियाण्यांचे संवर्धन काळाची गरज - डॉ. उमाकांत दांगट
परभणी, 07 ऑगस्ट (हिं.स.)। देशी बीज संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा, मात्र दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला विषय असून जैवविविधतेचे संरक्षण ही काळाची गरज आहे. पूर्वी शेतकरी स्वतः उत्कृष्ट बियाण्यांची निवड व संवर्धन करत होते. ही परंपरा पुन्हा जोपासल्यास उत्प
परभणी : जैवविविधता संरक्षणासाठी देशी बियाण्यांचे संवर्धन काळाची गरज - डॉ. उमाकांत दांगट


परभणी, 07 ऑगस्ट (हिं.स.)। देशी बीज संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा, मात्र दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला विषय असून जैवविविधतेचे संरक्षण ही काळाची गरज आहे. पूर्वी शेतकरी स्वतः उत्कृष्ट बियाण्यांची निवड व संवर्धन करत होते. ही परंपरा पुन्हा जोपासल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शाश्वत शेतीला चालना मिळेल, असे प्रतिपादन माजी कृषी आयुक्त तथा स्मार्ट प्रकल्पाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट (सेवानिवृत्त भा.प्र.से.) यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) आणि बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय फमराठवाडा बीज संवर्धक संवाद व कार्यशाळेफच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 6 व 7 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात आयोजित या कार्यशाळेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील 75 हून अधिक बीज संवर्धक शेतकर्यांनी सहभाग नोंदविला आहे.

उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी यांनी देशी वाणांचे जनुक संवर्धन करणारे शेतकरी हे समाजाचे खरे मित्र असल्याचे सांगितले. वाढत्या मानवी गरजा आणि नैसर्गिक संसाधनांच्या अतिरेकी वापरामुळे जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात र्हास झाला असून तिचे संशोधन, संकलन, जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

डॉ. उमाकांत दांगट यांनी मराठवाड्याचा नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध असल्याचे सांगत, फजगा आणि जगू द्याफ ही संकल्पना स्वीकारून जैवविविधतेचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे नमूद केले. देशी बियाण्यांच्या संवर्धनातून शेती अधिक स्वावलंबी आणि शाश्वत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकरी हेच देशी बीज संवर्धनाचे खरे शास्त्रज्ञ असल्याचे प्रतिपादन केले. हवामान बदलामुळे वाढलेल्या अनिश्रि्चत पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर देशी बियाण्यांचे महत्त्व अधिक वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामार्फत जनुक संवर्धनाचे कार्य सुरू असून विद्यापीठाच्या 25 अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांपैकी 10 केंद्रांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाच्या संचालक पूनम पाटे यांनी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्याची माहिती देत, जनुक संवर्धन करणार्या शेतकर्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख आणि प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या कार्याचा उल्लेख करत देशी बियाणे हीच भविष्यातील अन्नसुरक्षेची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे प्रकल्प अधिकारी रवींद्र वानखडे यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर बायफचे उपाध्यक्ष डॉ. रविराज जाधव यांनी हरितक्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादन वाढले असले तरी जैवविविधतेच्या संवर्धनाकडे अपेक्षित लक्ष गेले नसल्याची खंत व्यक्त केली. हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी बायफतर्फे राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande