
परभणी, 07 ऑगस्ट (हिं.स.)। सेलू येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने प्रसारित होणार्या ‘बालमंडळ’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. क्रांती दिनानिमित्त रविवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11.35 वाजता प्रसारित होणार्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतींचे प्रसारण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात शिक्षक तथा कवी डॉ. सुरेश हिवाळे लिखित आणि बाळू बुधवंत व प्रतिज्ञा चव्हाण दिग्दर्शित ङ्घग्रंथ माझे गुरूफ ही वाचन संस्कृतीवर आधारित नाटिका सादर करण्यात येणार आहे. तसेच संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी संगीतबद्ध केलेल्या शिक्षक अशोक लिंबेकर आणि ज्येष्ठ कवी गौतम सूर्यवंशी लिखित गीतांचेही प्रसारण होणार आहे. या आकाशवाणी कार्यक्रमात नूतन विद्यालयातील सान्वी हेलसकर, शाश्वत संघई, मृण्मयी इक्कर, शब्दा लाटकर, ऋतुजा महाजन, तीर्थेश संघई, यश कुटे, सोहम नेवरेकर, गार्गी आकणीकर, पृथ्वीराज इंगळे आणि जय चौधरी या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक किरण देशपांडे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, गणेश माळवे तसेच शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis