राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मंत्री अतुल सावे यांचा सहभाग; ओबीसी सक्षमीकरणावर भर
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।कर्नाटकातील बंगळुरू येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ११ व्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी सहभाग नोंदवला. देशभरातील ओबीसी समाजाच्या हक्क, विकास आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विविध विष
Q


छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।कर्नाटकातील बंगळुरू येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ११ व्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी सहभाग नोंदवला. देशभरातील ओबीसी समाजाच्या हक्क, विकास आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विविध विषयांवर या अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या हक्क, विकास आणि सामाजिक न्यायासाठी देशभरातील समाजबांधवांनी एकत्र येऊन संवाद साधावा आणि भविष्यातील वाटचालीची दिशा निश्चित करावी, या उद्देशाने अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन माध्यमातून संबोधित केले.

ओबीसी समाज हा देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधार असून शेतकरी, कारागीर, छोटे उद्योजक, कामगार आणि युवकांच्या योगदानातून देशाची प्रगती घडत असल्याचे सावे यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व आणि सामाजिक सन्मानाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. ओबीसी विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची संख्या वाढविणे, शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सध्या ७२ ओबीसी वसतिगृहे कार्यरत असून त्यांचा विस्तार करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

ओबीसी समाजाच्या आरक्षणासह सर्व घटनात्मक हक्कांचे संरक्षण करणे ही सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे सांगत, कोणत्याही समाजाच्या हक्कांवर परिणाम न करता सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सामाजिक समतेचा मार्ग अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशभरातील ओबीसी संघटनांनी परस्पर समन्वय आणि एकजुटीने काम केल्यास समाजाच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे आवाज उठवता येईल. ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन यापुढेही ठामपणे आणि खंबीरपणे सोबत राहील, असेही मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.

या अधिवेशनाला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वरा, केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, आमदार परिणय फुके, आमदार अभिजीत वंजारी, आमदार एच. एम. रेवण्णा, आमदार सुधाकर आडबाले, तेलंगणा राज्याचे मुख्य सल्लागार हनुमंथा गुरु, आमदार मधुसूदन गुरु, माजी मंत्री महादेवराव जाणकर तसेच शेषेराव येलेकर आणि बबनराव तायवाडे यांच्यासह विविध राज्यांतील मान्यवर उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande