
पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। पिंपरी शहरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर बीआरटी (Bus Rapid Transit) मार्ग हटविण्याची चाचपणी सुरू झाली आहे. बीआरटी मार्गांची दुरवस्था, अपुरी बससेवा, अर्बन स्ट्रीट डिझाइनमुळे अरुंद झालेले रस्ते आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने हा पर्याय विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.प्रशस्त रस्ते आणि मोठ्या उड्डाणपुलांसाठी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातही वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियान (JNNURM) अंतर्गत शहरात सुमारे ६० किलोमीटर लांबीचे बीआरटी मार्ग उभारण्यात आले होते. मात्र, अपेक्षित परिणाम न मिळाल्याने हेच मार्ग आता वाहतूककोंडीचे कारण ठरत असल्याची टीका होत आहे.मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी उभारलेल्या बीआरटी मार्गांवर बसची संख्या मर्यादित असल्याने अनेक ठिकाणी हे मार्ग रिकामे दिसतात. दुसरीकडे, बीआरटीमुळे सेवा रस्ते अरुंद झाल्याने सर्वसामान्य वाहनचालकांना वाहतूककोंडीचा अधिक सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी खासगी वाहनांची बीआरटी मार्गात घुसखोरीही वाढल्याचे चित्र आहे.याशिवाय विविध विकासकामांसाठी बीआरटी मार्गांवर सातत्याने खोदकाम करण्यात येत असून, दुरुस्तीच्या कामांमुळे मार्ग वारंवार बंद ठेवावे लागत आहेत. परिणामी वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.या सर्व बाबींचा विचार करून शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बीआरटी मार्ग हटविण्याचा पर्याय अभ्यासला जात असून, त्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडून प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू करण्यात आली आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु