आगामी २०२७-२८ अर्थसंकल्पात पुणेकरांच्या सूचनांना मिळणार प्राधान्य
पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या सन २०२७-२८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तयारीला सुरुवात झाली असून, यंदा नागरिकांना थेट विकासकामांचे प्रस्ताव मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहराच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन अर
pmc


पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

पुणे महापालिकेच्या सन २०२७-२८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तयारीला सुरुवात झाली असून, यंदा नागरिकांना थेट विकासकामांचे प्रस्ताव मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहराच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासनाने लोकसहभागावर भर दिला असून, ३१ ऑगस्टपर्यंत सूचना सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याअंतर्गत पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, उद्याने, क्रीडा आणि स्वच्छता अशा मूलभूत सुविधांशी संबंधित विकासकामांबाबत नागरिक, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ तसेच विविध संघटनांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. स्थानिक गरजांनुसार निधीचे नियोजन अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.नागरिकांना आपल्या सूचना ऑनलाइन पद्धतीने https://pbpune.pmc.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येणार आहेत. तसेच महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये छापील अर्ज विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.प्राप्त प्रस्तावांची संबंधित प्रभाग समितीच्या बैठकीत छाननी करण्यात येईल. व्यवहार्य आणि जनहिताच्या प्रस्तावांना प्राधान्य देत त्यांचा आगामी अर्थसंकल्पात समावेश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना सर्व प्रस्तावांचे संकलन करून ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आयुक्तांकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande