नंदुरबारच्या ५,७७८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा; ५९ कोटी २३ लाखांची रक्कम थेट खात्यावर
नंदुरबार, 07 ऑगस्ट (हिं.स.) | शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आज एक मोठा टप्पा गाठण्यात आला. राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे ६.२२ लाख पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्य
नंदुरबारच्या ५,७७८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा; ५९ कोटी २३ लाखांची रक्कम थेट खात्यावर


नंदुरबार, 07 ऑगस्ट (हिं.स.) | शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आज एक मोठा टप्पा गाठण्यात आला. राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे ६.२२ लाख पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर एकूण रु. ५ हजार ०२८ कोटींची रक्कम थेट ऑनलाईन पोर्टलद्वारे हस्तांतरित करण्यात आली. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार ७७८ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रु. ५९ कोटी २३ लाख २३ हजार ८६१ इतकी रक्कम थेट वर्ग करण्यात आली असल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी यांनी कळविली आहे.

३२ लाख कर्जखात्यांचा डेटा पोर्टलवर:राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर खाजगी बँका अशा एकूण ५३ बँकांनी महाआयटीच्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा संकलित झाला आहे. सहकार आयुक्त व निबंधक (पुणे) यांच्या माहितीनुसार २५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या पात्र यादीत १६.९६ लाख शेतकऱ्यांचा समावेश होता, ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील १७ हजार ५४३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्ह्यातील १० हजार ६०० कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

नवीन पीक कर्जाचा मार्ग मोकळा: शासनाने सहकार आयुक्तांकडे २२ जुलै रोजी ₹१ कोटी आणि ३० जुलै रोजी रु. ७,००० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. आज प्रत्यक्ष रक्कम हस्तांतरित झाल्यामुळे योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले आहेत.

ई-केवायसी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन:पहिल्या पात्र यादीत नाव असूनही ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अद्याप बाकी आहे, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्राशी’ संपर्क साधून ई-केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून लाभ खात्यावर जमा होईल, असेही आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक पुरी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande