
खासदार वाजे, आमदार हिरेंनी दिल्लीत घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
नाशिक, 07 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सरळमार्गी करण्याच्या महत्त्वाच्या मागणीसाठी नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान उद्धवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही उपस्थित राहून या मागणीला पाठिंबा दिला. भिन्न राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे हे दोन्ही लोकप्रतिनिधी नाशिकच्या विकासाच्या प्रश्नावर एकत्र आले होते. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सरळमार्गी संगमनेरमार्गे करण्याची मागणी पुन्हा एकदा रेल्वेमंत्र्यांसमोर ठामपणे मांडण्यात आली. पूर्वीच्या निर्धारित नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर आणि पुणे या मार्गामुळे संपूर्ण भागातील उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि प्रवासी वाहतुकीला मोठी चालना मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रेल्वे विकासकामांना तातडीने गती देण्याची मागणीही करण्यात आली. नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा विकास, प्रवासी सुविधाचा विस्तार, आवश्यक पायाभूत सुविधा आणि कुंभमेळ्याशी संबंधित सर्व रेल्वे कामे वेळेत पूर्ण करण्याच्या आवश्यकतेवरही भर देण्यात आला. बैठकीत पंचवटी एक्स्प्रेसला शताब्दी एक्स्प्रेसच्या रेक शेअरिंग व्यवस्थेतून मुक्त करून स्वतंत्र रेक उपलब्ध करून देण्याची मागणीही खासदार वाजे यांनी केली. त्याशिवाय नाशिकहून पंढरपूर, अयोध्या, अजमेर, तसेच कटरा वैष्णोदेवी या धार्मिक स्थळांसाठी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली. नाशिक जिल्ह्याशी संबंधित इतर विविध रेल्वे विकास प्रकल्प आणि प्रवासी सुविधांबाबतही सविस्तर चर्चा झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI