आष्टीच्या डोंगररांगात फुलले दुर्मिळ ‘अग्निशिखा‘ फूल; नागरिकांची गर्दी
बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील डोंगररांगांमध्ये अत्यंत दुर्मिळ आणि देखणे ''अग्निशिखा'' हे फूल नैसर्गिकरीत्या फुलले आहे. तमिळनाडूचे राज्य फूल आणि झिम्बाब्वेचे राष्ट्रीय फूल म्हणून जगभरात ओळखले जाणारे हे स
अग्निशिखा फूलं


बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील डोंगररांगांमध्ये अत्यंत दुर्मिळ आणि देखणे 'अग्निशिखा' हे फूल नैसर्गिकरीत्या फुलले आहे. तमिळनाडूचे राज्य फूल आणि झिम्बाब्वेचे राष्ट्रीय फूल म्हणून जगभरात ओळखले जाणारे हे सौंदर्यपूर्ण फूल पाहण्यासाठी स्थानिक पर्यावरणप्रेमी, वनस्पतीशास्त्र अभ्यासक आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

पावसाळ्याच्या आगमनासोबतच बीडसांगवीच्या दुर्गम डोंगररांगांवर 'अग्निशिखा' (ग्लोरिओसा सुपरबा) या औषधी वनस्पतीला अत्यंत आकर्षक फुले आली आहेत. सुरुवातीला पिवळ्या, नंतर नारंगी आणि पूर्ण उमलल्यावर अग्नीच्या पेटत्या ज्वालांसारख्या गडद लाल रंगात बदलणाऱ्या या फुलाला स्थानिक भाषेत 'कळलावी' असेही म्हणतात. महाराष्ट्रात ही वनस्पती वेगाने दुर्मिळ होत असून, येथील निसर्गाची ही देखणी किमया व समृद्ध जैवविविधता जपण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच आष्टीच्या डोंगर भागात आढळणाऱ्या या मौल्यवान व औषधी वनस्पतींचे रक्षण करण्यासाठी जंगलात चराई बंदी करून योग्य जोपासना करण्याची गरज आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने वेळेवर संवर्धन केले नाही, तर निसर्गाचा हा अमूल्य ठेवा नष्ट होण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande