परभणी : आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत गंगाखेडमध्ये वीज समस्यांवर आढावा बैठक
परभणी, 07 ऑगस्ट (हिं.स.)। गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या, जनसामान्यांच्या अडचणी आणि प्रलंबित विद्युत विकासकामांच्या अनुषंगाने महावितरणच्या गंगाखेड उपविभागीय कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांची आढावा बैठक पार
गावठाणातील वीजप्रश्न तातडीने सोडवा; शेतकर्यांना 14 तास अखंडित वीज द्या : आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत महावितरण अधिकार्यांची आढावा बैठक; प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना


परभणी, 07 ऑगस्ट (हिं.स.)। गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या, जनसामान्यांच्या अडचणी आणि प्रलंबित विद्युत विकासकामांच्या अनुषंगाने महावितरणच्या गंगाखेड उपविभागीय कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांची आढावा बैठक पार पडली. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यातील वीजविषयक प्रश्न, त्यावरील उपाययोजना आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत गावठाण भागात सायंकाळी 6 ते 10 या वेळेत वारंवार उद्भवणार्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले वीजविषयक प्रश्न प्राधान्याने निकाली काढावेत, तसेच शेतकर्यांना शेतीपंपांसाठी नियमित आणि किमान 14 तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

धोकादायक स्थितीत असलेले वाकलेले विद्युत खांब आणि लोंबकळणार्या वीजतारा तातडीने दुरुस्त करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक ठिकाणी केबलिंगची कामे पूर्ण करणे, नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविणे, बिघडलेले रोहित्र त्वरित कार्यान्वित करणे, अपूर्ण विद्युत विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करणे तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला. याशिवाय एचआरसी बॉक्ससाठी निधी उपलब्ध करून कामे मार्गी लावणे, शेतीसाठी एसडीटी ट्रान्सफॉर्मर बसविणे, वाढती वीज मागणी लक्षात घेऊन नवीन डीपी उभारणे आणि आवश्यक ठिकाणी विद्युत सुविधा उभारण्यासाठी लागणारी जमीन स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही बैठकीत देण्यात आली.

महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दारोले यांनी बैठकीतील सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांच्या वीजविषयक अडचणी प्राधान्याने सोडवून त्यांना लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठीही आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले, उपकार्यकारी अभियंता सतीश गुडे (गंगाखेड)यांच्यासह कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, महावितरणचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande