
जळगाव , 07 ऑगस्ट (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात आगामी काळात येणारे सण व उत्सव अत्यंत शांततेत, निर्विघ्नपणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत पार पडावेत, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने समाजकंटक आणि सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार ७ कुख्यात टोळ्यांतील १५ गुन्हेगारांसह ३५ वैयक्तिक सराईत गुन्हेगार अशा ५० गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, या सर्वांची माहिती नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली आहे.जिल्ह्यात सातत्याने गंभीर गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणारे आणि सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून हद्दपारीचे आदेश लागू असलेल्या टोळ्या आणि वैयक्तिक गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सण-उत्सवांच्या काळात कायदा हातात घेण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात किंवा संबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यास त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर