ससूनसाठी १,००० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय; १५ एकर जागेचा शोध सुरू
पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या विस्तारासाठी आणि नव्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठी १५ एकर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार येरवडा येथील मनोरुग्णालयाच्या १३८
sasoon


पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या विस्तारासाठी आणि नव्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठी १५ एकर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार येरवडा येथील मनोरुग्णालयाच्या १३८ एकर जागेपैकी सुमारे १५ एकर जागा ससून रुग्णालयासाठी देण्यात येण्याची शक्यता आहे.राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने पुण्यात अत्याधुनिक सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी महसूल विभागाकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीला ससून रुग्णालय व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, येरवडा मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, संबंधित तहसीलदार तसेच महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुमारे एक हजार खाटांचे असणार असून, त्यामध्ये कर्करोग उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयाची सुविधाही उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे १५ एकर जागेची पाहणी करून योग्य जागेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भूमी अभिलेख आणि महसूल विभागाला दिले आहेत.जागेची उपलब्धता आणि तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande