
रायगड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाने शंभर टक्के कामकाज पूर्ण केले असून, रायगड जिल्ह्यात ही प्रक्रिया पूर्ण करणारा पहिला मतदारसंघ ठरला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मतदार नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीएलओंनी घरोघरी भेटी देऊन पुनरिक्षणाचे काम पूर्ण केले. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा आणि रोहा या पाच तालुक्यांतील ३५१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदारसंघात एकूण २ लाख ६२ हजार ६८० मतदार असून, त्यात १ लाख ३४ हजार १५८ महिला आणि १ लाख २८ हजार ५२२ पुरुष मतदार आहेत.
एसआयआरअंतर्गत २ लाख ३३ हजार ३६३ गणनापत्रकांचे (ईएफ) डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, २९ हजार ३१७ गणनापत्रके प्राप्त झालेली नाहीत. यामध्ये ८ हजार ५६८ मृत मतदार, १ हजार १०७ अनुपस्थित अथवा शोधून न सापडलेले मतदार, १६ हजार ५० कायमस्वरूपी स्थलांतरित आणि ३ हजार ५४८ अन्यत्र नोंदणीकृत मतदारांचा समावेश आहे. तसेच १२ हजार ६७१ प्रकरणांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही.
या मोहिमेत महसूल, ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य विभागासह विविध शासकीय यंत्रणांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढील टप्प्यात अनकलेक्टेबल ईएफची फेरपडताळणी, अनमॅप्ड मतदारांचे मॅपिंग, अनोमली दूर करणे तसेच डिजिटायझेशन झालेल्या ईएफची तपासणी करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)