
अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेचा १५ ऑगस्ट रोजी होणारा स्थापनादिन यंदा सामाजिक बांधीलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम ठरणाऱ्या विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. बैठकीत स्थापनादिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता ‘जनतेचा उत्सव-शहराच्या विकासाचा संकल्प’ या संकल्पनेतून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि नागरिकांच्या सहभागाने शहरभर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी स्थापना दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या स्थापनेपासून शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व माजी महापौरांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
स्वातंत्र्यदिन आणि महानगरपालिका स्थापनादिन या दुहेरी पर्वाचे औचित्य साधून देशभक्ती गीतगायन स्पर्धा, ‘वर्धापन दिन व १५ ऑगस्ट’ या विषयावरील रांगोळी स्पर्धा, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित नृत्य, अभंग, गवळण, भारुड अशा विविध लोककलांचा २५ पेक्षा अधिक कलाकारांच्या सहभागातून रंगणारा मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या ऐतिहासिक प्रवासाचे दर्शन घडविणारी दुर्मीळ छायाचित्रांची विशेष प्रदर्शनी, सफाई कर्मचारी, इतर मनपा कर्मचारी आणि नागरिकांसाठी विविध तपासण्या, सर्वसमावेशक आरोग्यतपासणी शिबिर व नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले आदींसह तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी