
सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।नागरिकांशी नम्र आणि सौजन्यपूर्ण वर्तन राखण्यासाठी तसेच वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सोलापूर शहर वाहतूक शाखेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना आता बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येणार आहेत.
वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना पाळावयाच्या सात मार्गदर्शक सूचना सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) मनोज यादव यांनी जारी केल्या आहेत. नागरिकांशी आदराने संवाद साधणे, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार अथवा गैर-आर्थिक व्यवहार टाळणे आणि कारवाई पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अलीकडेच शहर वाहतूक शाखेच्या उत्तर विभागातील अंमलदार युवराज पवार यांचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हवालदार राजेंद्र खाडे यांनी दुचाकीस्वाराशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने शिस्तभंगाची आणि सुधारात्मक पावले उचलली आहेत.
सहायक पोलिस आयुक्त मनोज यादव यांनी उत्तर व दक्षिण विभागातील वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नागरिकांशी नेहमी नम्रतेने वागण्याचे निर्देश दिले. तसेच वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना सर्व प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने करण्याचे आदेश देण्यात आले.
बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या कारवाईची नोंद उपलब्ध राहणार असून, नागरिकांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड