
पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा आणि शासकीय शाळांमधील शिक्षकांच्या एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांसाठी 'पवित्र' संकेतस्थळामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ उत्तीर्ण उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहेशालेय शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ ही परीक्षा २७ ते ३० मे तसेच २ ते ५ जून २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.या परीक्षेतील गुणांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षणसेवक व शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार रिक्त पदे आणि शिल्लक आरक्षणाचा विचार करून ८० टक्के पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.'पवित्र' संकेतस्थळावरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यापैकी१९ हजार ८८१ पदे मुलाखतीशिवाय, तर१० हजार ३२८ पदे मुलाखतीसहभरली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 'पवित्र' संकेतस्थळावर पदनिहाय प्राधान्यक्रम नोंदविण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी ११ ऑगस्टपर्यंत आपले प्राधान्यक्रम अंतिम करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु