
वर्धा 07 ऑगस्ट (हिं.स.)कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात रविवार, ९ ऑगस्टला जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा. अमर काळे, आत्मा नियामक मंडळाच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वान्मथी सी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रानभाज्यांमध्ये कुंजर, अंबाडी, पाथरी, कारडू, कपाळफोडी, गवती चहा, शेवगा, करवंद, अळू, चिवर, गोडनिम, तरोटा, राजगिरा, आघाडा, केना, सुरण, फास बरबटी, कुकडा, घोगली, ताजे मशरुम, भूईनीम, आंबटचुका, मायाळु/पोई, माठ, गुळवेल, करवंदाचे लोणचे, अंबाडीचे सरबत, पावडर, भाकर, लोणचे, बेलाचे लोणचे, सरबत, यांसारखे विविध प्रकार प्रदर्शनात विक्रीकरिता उपलब्ध होणार आहे. रानभाजी महोत्सवादरम्यान पाककृती करून दाखविण्यात येणार असून शहरातील ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी