
मुंबई, 07 ऑगस्ट (हिं.स.)। शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीने गुरुवारी भारतात आपला नवीन मिडरेंज स्मार्टफोन रेडमी नोट १७ ५जी लाँच केला आहे. नोट १७ मालिकेतील हा भारतात दाखल झालेला पहिला स्मार्टफोन असून, काही आठवड्यांपूर्वी चीनमध्ये सादर झाल्यानंतर आता तो भारतीय बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे. भारतीय आवृत्तीमध्येही चीनमधील मॉडेलप्रमाणेच बहुतांश फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अमेझॉन आणि शाओमी इंडियाच्या ऑनलाईन स्टोअरवरून १२ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
रेडमी नोट १७ ५जी हा ड्युअल-सिम स्मार्टफोन अँड्रॉइड १६ आधारित हायपरओएस ३ या नवीन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. कंपनीने या फोनसाठी चार वर्षे ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट्स आणि सहा वर्षे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. या फोनमध्ये ६.९ इंचांचा फुल एचडी प्लस अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, तो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १०० टक्के डीसीआय-पी३ कलर गॅमट, १८०० निट्स पीक ब्राइटनेस, २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ७आय प्रोटेक्शनसह येतो. याशिवाय हायड्रोटच २.० तंत्रज्ञानामुळे ओल्या किंवा दमट बोटांनीही स्क्रीनचा टच अधिक चांगला प्रतिसाद देतो.
फोनमध्ये ४ नॅनोमीटर प्रक्रियेवर आधारित स्नॅपड्रॅगन ४ जनरेशन ४ प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत ८ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि २५६ जीबीपर्यंत यूएफएस २.२ स्टोरेज मिळते. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज २ टीबीपर्यंत वाढवता येते. व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टिम आणि आयपी६५ रेटिंगमुळे धूळ व पाण्यापासूनही काही प्रमाणात संरक्षण मिळते.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ८००० एमएएच क्षमतेची बॅटरी. ती ४५ वॅट फास्ट चार्जिंग आणि २२.५ वॅट रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर फोन सुमारे अडीच दिवस वापरता येऊ शकतो.
भारतात या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ३०,९९९ रुपयांत उपलब्ध होईल. एसबीआय, अॅक्सिस बँक आणि कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ३,००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटही मिळणार आहे. हा फोन आर्क्टिक ब्ल्यू, डार्क नाईट आणि स्टारलाईट पर्पल या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
मात्र, या स्मार्टफोनच्या किंमतीच्या तुलनेत मिळणारी रॅम, स्टोरेज, प्रोसेसर आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्स यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. वाढत्या स्टोरेज टंचाईमुळे कंपन्या किंमती वाढवत असताना हार्डवेअरमध्ये काही प्रमाणात तडजोड करत असल्याचे चित्र दिसत आहे. रेडमी नोट १७ ५जीमध्येही त्याच प्रकारचा कल दिसून येत असून, यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजूनही अपेक्षेइतकी दमदार वैशिष्ट्ये मिळत नसल्याची चर्चा तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule