
सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तातडीने आधार सीडिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २६ हजार ५५३ पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी संबंधित तहसील कार्यालये, ग्रामपंचायती, सहकारी संस्था (सोसायटी) आणि बँकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीतील १८ हजार ५७३ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण सुमारे ७० टक्के आहे. मात्र अद्याप ७ हजार ६९० शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार सीडिंग करणे बंधनकारक आहे. आधार सीडिंग पूर्ण झाल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करता येणार नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी सर्वप्रथम कर्जमाफीच्या यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी.
शेतकऱ्यांनी मोबाईलवर प्राप्त झालेला संदेश तपासावा किंवा जवळच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, सहकारी संस्था अथवा बँकेत उपलब्ध असलेल्या यादीत आपले नाव पडताळून पाहावे. यादीत नाव असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी नावासमोरील विशेष क्रमांक आणि आधार क्रमांक घेऊन जवळच्या महा ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा अन्य शासकीय सेवा केंद्रात जावे.
या ठिकाणी विनाशुल्क आधार सीडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार सीडिंग पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचा लाभ लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
आधार सीडिंग करताना कोणतीही अडचण आल्यास संबंधित तलाठी, मंडल अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.
------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड