मुंबई-पुणे महामार्गावरील पाथरगाव दगडी पूल बंद; वाहतुकीत मोठे बदल
पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील पाथरगाव येथील जुना दगडी इंद्रायणी नदी पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंड
express way


पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील पाथरगाव येथील जुना दगडी इंद्रायणी नदी पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.

आदेशानुसार, पुण्याकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रारंभी कि.मी. ९४ येथून वळविण्यात येत आहेत. तसेच सोमाटणे फाटा आणि वडगाव-तळेगाव फाटा येथूनही ही वाहने द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. मुंबईकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहने खंडाळा एक्झिटवरून जुन्या महामार्गावर येऊ दिली जाणार नाहीत. ही वाहने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरूनच मार्गस्थ होतील. तसेच लोणावळा-कुसगाव टोलनाका (कि.मी. ५५) येथूनही वाहतूक द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येत आहे.

दरम्यान, दुचाकी, तीनचाकी आणि हलकी चारचाकी वाहने नवीन पुलावरून सुरू राहणार आहेत. मात्र, मुंबई आणि पुणे या दोन्ही दिशांकडून येणारी सर्व अवजड मालवाहू वाहने द्रुतगती महामार्गावरूनच वळविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande