
सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त आयोजित 'प्रबोधनपर्व' उपक्रमांतर्गत शनिवार, ९ ऑगस्ट रोजी इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. उमेश बगाडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. '
महात्मा फुले आणि त्यांची सत्ता संकल्पना' या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. रा. गो. म्हेत्रस असतील, अशी माहिती महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समितीने दिली. प्रा. डॉ. उमेश बगाडे हे इतिहासाचे अभ्यासक आणि आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे अभ्यासपूर्ण भाष्यकार म्हणून ओळखले जातात. 'महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा आणि जात-वर्गाचे वर्चस्व' तसेच 'महात्मा जोतीराव फुले' ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. सामाजिक सुधारणा, जातिव्यवस्था आणि परिवर्तनवादी विचारांवर त्यांनी विपुल लेखन केले असून, राज्यभर विविध व्याख्यानांद्वारे ते जनजागृती करत आहेत. कार्यक्रमास संयोजन समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य नरेश बदनोरे, उपाध्यक्ष प्रा. एम. आर. कांबळे, लक्ष्मीदास सोनकवडे, कार्याध्यक्ष शंकर पाटील, कोषाध्यक्ष ऍड. गोविंद पाटील, सचिव ऍड. मनीष गडदे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. प्रबोधनाच्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड