
पुणे, 07 ऑगस्ट (हिं.स.)।प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे येथे नवीन दुचाकी वाहनांसाठी आकर्षक आणि पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून फेसलेस (ऑनलाइन) सेवा सुरू करण्यात येणार आहे.
ही सेवा पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असणार असून, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी आरटीओ कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने कोणतेही शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांना घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.
या सेवेसाठी अर्जदारांना आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपीद्वारे प्रमाणीकरण करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. नव्याने सुरू होणाऱ्या 'एमएच १२ झेड झेड' मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक या सुविधेद्वारे आरक्षित करता येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
परिवहन विभागाच्या मते, नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे वाहन क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु