सोलापूर महापालिकेच्या सेवा अधिक सक्षम होणार; १३० पदांच्या भरतीला हिरवा कंदील
सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेतील अत्यावश्यक नागरी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने १३० रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथिल करत नगरविकास विभागाने
smc


सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेतील अत्यावश्यक नागरी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने १३० रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथिल करत नगरविकास विभागाने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.

यापूर्वी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासनाने अपवादात्मक बाब म्हणून आस्थापना खर्चावरील ३५ टक्के मर्यादा शिथिल केली होती. त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विविध कारणांमुळे १३० पदे रिक्त राहिली. ही पदे भरण्यासाठी महापालिकेने शासनाकडे विशेष परवानगी मागितली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने उर्वरित पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ अभियंता सहाय्यक, सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक/लिपिक-टंकलेखक, फिल्टर इन्स्पेक्टर, फायर मोटार मेकॅनिक, फायरमन, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), मिडवाईफ, पाईप फिटर, पंप ऑपरेटर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, लघुलेखक आणि महिला व बाल विकास अधिकारी अशा विविध संवर्गांतील एकूण १३० पदे भरली जाणार आहेत.

या भरतीमुळे महापालिकेच्या अभियांत्रिकी, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन, महिला व बाल विकास आणि प्रशासकीय विभागांतील मनुष्यबळाची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. परिणामी, नागरिकांना अधिक जलद, प्रभावी आणि दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या २९ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांची भरती पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि ऑनलाइन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande