
नवी दिल्ली , 09 ऑगस्ट (हिं.स.)।कॅनडातील टोरंटो येथे ३० वर्षीय भारतीय वंशाच्या हिमांशी खुराना हिच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्येच्या सुमारे सात महिन्यांनंतर फरार असलेला मुख्य आरोपी आणि हिमांशीचा ३२ वर्षीय साथीदार अब्दुल गफूरी याला टोरंटो विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.
हिमांशी खुराना यांचा मृतदेह गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी टोरंटो येथील त्यांच्या निवासस्थानी आढळून आला होता. टोरंटो पोलिसांनी या प्रकरणाला घरगुती हिंसाचारातून झालेली हत्या असे संबोधले होते. हिमांशीचा साथीदार अब्दुल गफूरी हा टोरंटो येथील रहिवासी असून, त्या वेळी पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रथम श्रेणीतील हत्येचा आरोप दाखल केला होता. पोलिसांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, गफूरीला शुक्रवारी टोरंटो विमानतळावर अटक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पोलिस यंत्रणांच्या मदतीने कॅनडाच्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर प्रथम श्रेणीतील हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमांशी खुराना यांची १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. टोरंटो पोलिसांना स्ट्रॅचन अव्हेन्यू आणि वेलिंग्टन स्ट्रीट वेस्ट परिसरातून एका महिला बेपत्ता असल्याची माहिती रात्री सुमारे १० वाजून ४१ मिनिटांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ६ वाजून ३० मिनिटांनी याच परिसरातील एका घरातून महिलेचा मृतदेह आढळून आला.
टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने हिमांशी खुराना यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले होते. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत केली जात असल्याचेही सांगितले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode