


* ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न
* संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शिवसैनिक व रक्तदात्यांचा गौरव!
नवी दिल्ली, १० ऑगस्ट (हिं.स.) : क्रांतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने नवी दिल्ली येथील बेस हॉस्पिटल (दिल्ली कॅन्टोन्मेंट) येथे ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिवसैनिक, खेळाडू आणि मल्लांसह ८०० जणांनी रक्तदान केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 'डबल महाराष्ट्र केसरी' चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या महारक्तदान शिबिरात शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली व शिवसैनिकांपुढे एक नवा आदर्श ठेवला.
‘सिंदूर महारक्तदान यात्रा' देशाचा सेवाभाव, मानवी संवेदनशीलता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक - राजनाथ सिंह
ऑपरेशन सिंदूरने जगासमोर भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य आणि पराक्रम सिद्ध केले, तर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘सिंदूर महारक्तदान यात्रा' म्हणजे देशाचा सेवाभाव, मानवी संवेदनशीलता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील रक्तदाते आणि शिवसैनिकांचा गौरव केला.
आपल्या भाषणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भरभरून कौतुक केले. महाराष्ट्रातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दिल्लीत सैनिकांसाठी रक्तदान करायला येणे ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीतून आलेल्या या रक्तदात्यांनी शौर्य आणि करुणेचा हा वारसा अत्यंत निष्ठेने जपला असल्याचे त्यांनी नमूद केले. रक्तदान हेच खरे 'महादान' असल्याचे सांगत, आज संकलित केलेले हे रक्त आपत्कालीन परिस्थितीत जवान आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रक्तदान करणारे हे 'रक्तवीर' खरे योद्धेच - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांच्या अभूतपूर्व उत्साहाचा उल्लेख केला. गेल्या वर्षी या रक्तदान शिबिरासाठी महाराष्ट्रातून ९ हजार, तर यंदा तब्बल १६,००० रक्तदात्यांनी नावनोंदणी केली होती. रक्तदात्यांचा प्रतिसाद प्रचंड होता आणि रक्तदाते अजिबात कमी पडले नाहीत; परंतु लष्करी रुग्णालयाच्या उपलब्ध क्षमतेनुसार व नियोजनानुसारच प्रत्यक्ष ८०० जणांचे रक्तदान करून घेण्यात आले, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सीमेवर बंदूक घेऊन जागणाऱ्या जवानांमुळेच आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो. त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी रक्तदान करणे ही छोटी गोष्ट नसून हीसुद्धा राष्ट्रसेवाच आहे. सीमेवर लढत नसले, तरी आज रक्तदान करणारे हे 'रक्तवीर' खरे योद्धेच आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, राज्यसभा सदस्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्यासह व्हाइस ॲडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी आणि लेफ्टनंट जनरल अविनाश दास हे वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना लष्करी रुग्णालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी