आंदोलनांदरम्यान 'जेन-झी' पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला - धर्मेंद्र प्रधान
भुवनेश्वर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। नीट पेपर लीक प्रकरण आणि त्यानंतर देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनादरम्यान काही लोकांनी ‘जेन झी’
Dharmendra Pradhan mislead Gen-Z during protests


भुवनेश्वर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। नीट पेपर लीक प्रकरण आणि त्यानंतर देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनादरम्यान काही लोकांनी ‘जेन झी’ म्हणजेच तरुण पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच मंत्रिपदापेक्षा देशातील तरुणांचे भविष्य आणि त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी आपल्यासाठी अधिक महत्त्वाची होती, असा दावा प्रधान यांनी केला.

शिक्षण मंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी त्यांचे हे पहिलेच महत्त्वाचे वक्तव्य समोर आले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांची आंदोलने वाढल्यानंतर २५ जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. भुवनेश्वर येथील जीएम विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना प्रधान यांनी आपल्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले.

‘जेन झी’बाबत बोलताना प्रधान म्हणाले की, ही आपल्या देशातीलच मुले असून त्यांच्याशी आपली कोणतीही वैयक्तिक अडचण नाही. भारतात दरवर्षी सुमारे दोन कोटी मुलांचा जन्म होतो आणि गेल्या दहा वर्षांत जवळपास २० कोटी मुले जन्माला आली आहेत. या तरुण पिढीच्या स्वतःच्या आकांक्षा असून भविष्यात हीच पिढी भारताला ‘विश्वगुरू’ बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले. मंत्रिपदाबाबत बोलताना पदापेक्षा देश आणि तरुणांचे भविष्य महत्त्वाचे असल्याने आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, असेही प्रधान यांनी सांगितले.

दरम्यान, रायराखोल येथील कार्यक्रमात प्रधान यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडीचे प्रमुख नवीन पटनाईक यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांच्या विरोधात बीजेडीच्या युवा आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांनी ‘धर्मेंद्र प्रधान गो बॅक’च्या घोषणा देत आंदोलन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना आपण शेतकऱ्याचा मुलगा असून कितीही वेळा मागे जाण्यास सांगितले, तरी ओडिशाच्या जनतेसाठी पुन्हा काम करत राहू, असे प्रधान यांनी म्हटले. नवीन पटनाईक आपल्याला ओडिशासाठी ‘कलंक’ ठरवण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी तरुणांचा राजकीय आंदोलनांसाठी वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande