इंग्लंडमध्ये भीषण उष्णतेनंतर दुष्काळसदृश स्थिती; पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता
लंडन , 09 ऑगस्ट (हिं.स.)।इंग्लंडमध्ये वारंवार पडलेल्या भीषण उष्णतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लंडनमधील ब्लॅकहीथ परिसरालाही या दुष्काळाचा फटका बसला असून, त्याचा परिणाम इंग्लंडच्या जवळपास निम्म्या भागावर झाला आहे. संपूर्ण वेल्स आणि इ
इंग्लंडमध्ये भीषण उष्णतेनंतर दुष्काळसदृश स्थिती; पुन्हा  उष्णतेच्या लाटेची शक्यता


लंडन , 09 ऑगस्ट (हिं.स.)।इंग्लंडमध्ये वारंवार पडलेल्या भीषण उष्णतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लंडनमधील ब्लॅकहीथ परिसरालाही या दुष्काळाचा फटका बसला असून, त्याचा परिणाम इंग्लंडच्या जवळपास निम्म्या भागावर झाला आहे. संपूर्ण वेल्स आणि इंग्लंडचा जवळपास अर्धा भाग या परिस्थितीने प्रभावित झाला आहे.

यूकेमध्ये जुलै महिन्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या केवळ 35 टक्केच पाऊस यंदा झाला. त्यामुळे 1868 नंतरचा हा देशातील सर्वात कोरडा जुलै महिना ठरला आहे. आता या आठवड्याच्या शेवटी यूकेमध्ये पुन्हा एकदा तापमान वाढण्याची शक्यता असून, पुढील आठवड्यात यंदाची पाचवी मोठी उष्णतेची लाट (हीटवेव्ह) जाहीर होण्याची शक्यता आहे.

रविवारपासून पुढील आठवड्यापर्यंत दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकते. मंगळवारपर्यंत इंग्लंडच्या बहुतांश भागांसाठी पिवळा हीट-हेल्थ अलर्ट जारी करण्यात आला आहे. उष्णतेमुळे आरोग्य आणि सामाजिक सेवा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून, वृद्ध, आजारी आणि इतर असुरक्षित नागरिकांच्या जीवाला अधिक धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, आगामी काळात यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीकडून या अलर्टमध्ये आवश्यकतेनुसार बदल किंवा अपडेट केले जाण्याची शक्यता आहे.

आगामी काही दिवसांत तापमान पुन्हा सरासरीपेक्षा अधिक होण्यास सुरुवात होईल. इंग्लंड आणि वेल्सच्या बहुतांश भागात तापमान 25 ते 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये मात्र हवामान तुलनेने थंड राहील. येथे तापमान 17 ते 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत ढगाळ वातावरणासह हलका पाऊस आणि वेगवान वारेही वाहण्याची शक्यता आहे.

रविवारपासून आणि पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होईल. यूकेच्या अनेक भागांत तापमान हीटवेव्हची मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. ही मर्यादा संबंधित ठिकाणानुसार 25 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. ही उष्णता संपूर्ण आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागांत सलग तीन दिवस उष्णतेची पातळी उच्च राहिल्यास यंदाची पाचवी मोठी हीटवेव्ह घोषित केली जाऊ शकते.

युनायटेड किंगडममध्ये यंदाचा उन्हाळा आतापर्यंत अनेक विक्रम मोडणारा ठरला आहे. जुलै महिना यूकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक सूर्यप्रकाश असलेला जुलै ठरला आहे. तसेच इंग्लंड आणि वेल्ससाठी हा आतापर्यंतचा सर्वात कोरडा जुलै महिना ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande