ब्राझीलमध्ये हेलिकॉप्टर कोसळून अपघात; चौघांचा मृत्यू
रिओ दी जानेरो, 09 ऑगस्ट (हिं.स.)।ब्राझीलमधील रिओ दी जानेरो शहरात जंगलाच्या परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) सकाळी सुमारे ११ वाजून ११ मिन
ब्राझीलमध्ये हेलिकॉप्टर कोसळून अपघात; चार जणांचा मृत्यू


रिओ दी जानेरो, 09 ऑगस्ट (हिं.स.)।ब्राझीलमधील रिओ दी जानेरो शहरात जंगलाच्या परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) सकाळी सुमारे ११ वाजून ११ मिनिटांनी ऑल्टो दा बोआ व्हिस्टा येथील व्हिस्टा चिनेसा परिसरात हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यानंतर दाट झाडाझुडपांनी व्यापलेल्या परिसरात हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले.

वृत्तानुसार, विशेष पथकांनी जमिनीमार्गे अपघातस्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर घटनास्थळी आगही लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकांना तैनात करण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह कोलंबियाच्या तीन महिला प्रवास करत होत्या. या तिन्ही महिला एकाच कुटुंबातील सदस्य होत्या. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. मात्र, मृतांची ओळख आणि इतर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

रिओ दी जानेरोचे महापौर एडुआर्डो कॅव्हालिएरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत व्हिस्टा चिनेसाजवळील तिजुका नॅशनल पार्कमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या.त्यांनी सांगितले की, त्यांनी ब्राझीलच्या नागरी विमान वाहतूक संस्थेच्या (एएनएसी) अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. रिओ प्रशासनाने एएनएसी ला तातडीने कारवाई करण्यासोबतच देखरेख वाढवण्याची विनंती केली आहे. तसेच, शहरात सातत्याने वाढत असलेल्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.महापौरांनी सांगितले की, आवश्यक ती पावले उचलण्यासाठी आणि कारवाईत मदत करण्यासाठी रिओ प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा एएनएसीच्या मदतीसाठी उपलब्ध करून दिली जाईल.

यापूर्वी जून महिन्यात रिओ दी जानेरोच्या हवाई हद्दीत दोन हेलिकॉप्टरची एकमेकांशी धडक झाली होती. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अमेरिकन गायक ऑलिव्हर ट्री आणि अर्जेंटिनाचा यूट्यूबर गॅस्पर प्रिम यांचाही समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande