
नवी दिल्ली , 09 ऑगस्ट (हिं.स.)।भारत सरकारने अरुणाचल प्रदेशाच्या अधिकृत सर्व्हे ऑफ इंडिया नकाशात महत्त्वपूर्ण बदल करत तो अद्ययावत केला आहे. या अद्ययावत नकाशात चीनच्या सीमेशी संबंधित सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे पर्वतीय दर्रे, तलाव, वसाहती तसेच 1962 च्या भारत-चीन युद्धाशी संबंधित एका युद्धस्मारकाचा समावेश करण्यात आला आहे.भारताने नकाशात हे बदल अशा वेळी केले आहेत, जेव्हा चीनकडून अरुणाचल प्रदेशाला सातत्याने ‘झांगनान’ किंवा ‘दक्षिण तिबेट’ असे संबोधले जात असून, या प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अरुणाचल प्रदेशाचा अधिकृत सर्व्हे ऑफ इंडिया नकाशा अद्ययावत करताना चीनच्या सीमेशी संबंधित 27 महत्त्वाच्या ठिकाणांना भारतीय नावांसह नकाशावर चिन्हांकित करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशातील मॅकमोहन रेषेला लागून असलेल्या अनेक वादग्रस्त आणि संवेदनशील सीमावर्ती भागांचा अधिकृत नकाशात समावेश केल्यामुळे भारत-चीन सीमेवरील अनेक सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे भाग स्पष्टपणे अधोरेखित झाले आहेत.
यामध्ये एका अशा पर्वतीय भागाचाही समावेश आहे, जिथे 1962 च्या युद्धापूर्वी भारतीय लष्कराची एक अग्रिम चौकी होती. नकाशात भारतीय नावाने दर्शविण्यात आलेले हे युद्धस्मारक सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. 1962 च्या युद्धापूर्वी भारताने येथे ‘माजा कॅम्प’ नावाची अग्रिम चौकी स्थापन केली होती. युद्धानंतर ही चौकी रिकामी करण्यात आली आणि त्यानंतर हा परिसर वादग्रस्त बनला. ताज्या अहवालांनुसार, चिनी लष्कराने आता या पर्वतीय भागात बांधकाम केले आहे.
अद्ययावत नकाशात द्जो ला, रिजा ला, पुकुर ला आणि थग ला खास या चार पर्वतीय दर्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सांबो सरोवराचाही भारतीय नावाने नकाशात समावेश करण्यात आला आहे. थग ला दर्रा हा विशेष महत्त्वाचा आहे, कारण 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात येथेच संघर्ष झाला होता.उर्वरित 21 ठिकाणांमध्ये लॉन्गजू, माजा, बीसा, बडा कुंदुन, छोटा कुंदुन, धन बारी, प्रीतनगर, बुद्धमंदिर, जयरामपूर, तेरीतनगर, रामनगर, जसवंत गड, सागर, पद्मा, ज्योतिनगर, बैसाखी, छोटा रोपुक, बडा रोपुक, शिवाजी नगर, सुनपुरा आणि कामलंग नगर यांचा समावेश आहे. याशिवाय शेर-ए-थापा स्मारकाचाही नकाशात समावेश करण्यात आला आहे.
गेल्या दशकात करण्यात आलेल्या संरक्षणविषयक आकलनात अरुणाचल प्रदेशाच्या सीमेलगत असलेल्या सहा वादग्रस्त आणि चार संवेदनशील भागांची ओळख करण्यात आली होती. चिनी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा दलांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले होते.या सहा वादग्रस्त भागांमध्ये अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील असाफिला, लॉन्गजू, बीसा आणि माजा, तसेच तवांगमधील तुलुंग ला आणि यांग्त्से यांचा समावेश होता.यापैकी असाफिला, लॉन्गजू, बीसा आणि माजा या भागांवर चीनने बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे सांगितले जाते. यामध्ये असाफिला हा अंतर्गत भागात स्थित आहे. आता लॉन्गजू, बीसा आणि माजा या भागांना भारताने आपल्या भूभागाचा हिस्सा म्हणून अधिकृत नकाशात दर्शविले आहे.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश सरकारशी सल्लामसलत करून हे काम करण्यात आले आहे. या ठिकाणांची नावे अधिकृत नकाशांमध्ये समाविष्ट करण्यामागील उद्देश संबंधित भागांची अचूक ओळख स्पष्ट करणे आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.या माध्यमातून या सीमावर्ती भागांची अधिकृत ओळख निश्चित करणे आणि त्यांना भारताच्या प्रशासकीय नोंदींमध्ये समाविष्ट करणे, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode