
मुंबई, 09 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रात सध्या सर्वच भागांत मुसळधार पावसाची स्थिती नसली, तरी पुढील काही दिवसांत राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः १३ ऑगस्टपासून कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होऊ शकतो. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण-गोवा परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ९ ते १२ ऑगस्टदरम्यान कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार असून, त्यानंतर काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाच्या सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागांत पाणी साचणे, स्थानिक पूरस्थिती निर्माण होणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा आणि भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात राज्यात आतापर्यंत ६३७.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरी ६२२.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुजारीटोला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या नदीपात्रात १६ हजार ४७६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule