केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुदुच्चेरी पोलिसांना राष्ट्रपतींचे ध्वज प्रदान
पुदुच्चेरी, 09 ऑगस्ट (हिं.स.)केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पुदुच्चेरी पोलिसांना ''राष्ट्रपती ध्वज'' (President’s Colours) प्रदान केला. या प्रसंगी पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन आणि मुख्यमंत्री एन. रंगासामी यांच्यासह इतर अ
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह


पुदुच्चेरी, 09 ऑगस्ट (हिं.स.)केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पुदुच्चेरी पोलिसांना 'राष्ट्रपती ध्वज' (President’s Colours) प्रदान केला. या प्रसंगी पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन आणि मुख्यमंत्री एन. रंगासामी यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुदुच्चेरी हे दक्षिण भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक चेतनेचे जिवंत प्रतीक असल्याचे अमित शाह यावेळी म्हणाले. आज पुदुच्चेरी पोलीस देशातील अशा पोलीस दलांच्या पंक्तीत सामील झाले आहेत ज्यांना 'राष्ट्रपती ध्वज' प्रदान करण्यात आला. हा सन्मान प्राप्त होणे, हे या दलाचे शौर्य, अथक परिश्रम आणि समर्पणाची ग्वाही देते, असेही त्यांनी नमूद केले.

'राष्ट्रपती ध्वज' प्राप्त करणे हा कोणत्याही पोलीस दलासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा क्षण असतो. पुदुच्चेरीचे रक्षण करणे, तेथील अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करणे आणि तिचा सन्मान जपणे ही जबाबदारी पुदुच्चेरी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, पराक्रम, सेवा आणि समर्पणाची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला असल्याचे शाह यांनी सांगितले.

दीर्घकाळ फ्रेंच राजवटीखाली राहूनही पुदुच्चेरीने आपली भारतीय ओळख आणि आध्यात्मिक चैतन्य टिकवून ठेवल्याचे त्यांनी नमूद केले. पुदुच्चेरीमध्ये 1 ऑक्टोबर 1963 रोजी पोलीस महासंचालक (DGP) पद निर्माण करण्यात आले आणि तेव्हापासून इथल्या पोलिसांनी या सीमावर्ती भागाची अंतर्गत सुरक्षा मजबूत केल्याचे गौरवोद्गार शाह यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने ब्रिटिशांनी बनवलेल्या दंड संहितांच्या जागी तीन नवे फौजदारी कायदे लागू केले असल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. केवळ शिक्षा देणे नाही; तर तंत्रज्ञानाचा वापर करून आणि वेळेच्या मर्यादेत नागरिकांना न्याय सुनिश्चित करणे हा या कायद्यांचा मुख्य उद्देश असून, हे नवे फौजदारी कायदे तंत्रज्ञान, वेळेची मर्यादा आणि विश्वास या तीन स्तंभांवर आधारित असल्याचे शाह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षांत केंद्रशासित प्रदेशांना मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. केंद्र सरकार पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाला अधिक सक्षम करण्यासाठी तेथील लोकांसाठी विविध विकास प्रकल्प राबवत आहे. राष्ट्रीय महामार्ग 332-अ चे 2,200 कोटी रुपये खर्चाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, येथे सुमारे 3,400 मीटर लांब आणि 45 मीटर रुंद अशा विस्तारीत धावपट्टीची उभारणी केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

1950 ते 2014 या काळात भारत सरकारने पुदुच्चेरीच्या विकासकामांसाठी केवळ 3,500 कोटी रुपये दिले होते. तर 2014 ते 2026 या काळात मोदी सरकारने 13,762 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, जे पूर्वी दिलेल्या रकमेच्या जवळपास चौपट आहे, असे शाह यांनी सांगितले.

गेल्या नऊ वर्षांत भारत सरकारने पुदुच्चेरीमध्ये 39,000 कोटी रुपयांच्या औद्योगिक गुंतवणुकीलाही प्रोत्साहन दिले असून, लखपती दिदी, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत, शौचालयांची उभारणी, मोफत अन्नधान्य योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) यांसारख्या उपक्रमांचा लाभ या प्रदेशातल्या नागरिकांना मिळाला असल्याचे, ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार पुदुच्चेरीच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि तेथील जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर असल्याचे अमित शाह यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande