‘मराठा समाजात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न’ - मनोज जरांगे
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। फडणवीस सरकार मराठा समाजात गैरसमज निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका
manoj


सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

फडणवीस सरकार मराठा समाजात गैरसमज निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा आपला उद्देश कधीच नव्हता. राजकारणापेक्षा मराठा समाजाचे कल्याण आणि गरिबांच्या मुलांना आरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरातील सुशोभीकरण आणि ऐतिहासिक भित्तीशिल्पाचे उद्घाटन मनोज जरांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या आरक्षण धोरणावर जोरदार टीका केली.

शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सरकारने या नोंदींसह सातारा आणि कोल्हापूर संस्थानांचे गॅझेट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली.२१९ प्रमाणपत्रे अवैध ठरल्याच्या दाव्यावरही त्यांनी सरकारवर टीका केली. हा प्रकार मराठा समाजात गैरसमज निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाने ओबीसींचे एकही प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केलेली नाही. मराठा समाजातील गरजू मुलांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे, एवढीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला प्रमाणपत्रे आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात सरकार अपयशी ठरले, तर आगामी निवडणुकीत मराठा समाज सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपली ताकद दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande