
अंकारा, 09 ऑगस्ट (हिं.स.)।सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कियेदरम्यान झालेल्या संयुक्त संरक्षण कराराबाबत तुर्कियेने स्पष्ट केले आहे की, हा करार इराण किंवा कोणत्याही अन्य देशाला लक्ष्य करून करण्यात आलेला नाही. तुर्कियेचे परराष्ट्रमंत्री हाकान फिदान यांनी शनिवारी सांगितले की, तिन्ही देशांदरम्यान झालेला हा करार प्रादेशिक स्थैर्य आणि सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
शुक्रवारी सौदी अरेबियातील पवित्र मक्का शहरात सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘मक्का संयुक्त संरक्षण करारा’वर स्वाक्षरी केली. या करारानुसार, तिन्हीपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल.
तुर्कियेचे परराष्ट्रमंत्री हाकान फिदान यांनी सरकारी वृत्तसंस्थाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या करारात कोणत्याही विशिष्ट देशाला सामायिक शत्रू म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. ते म्हणाले, “जो देश आमच्यावर हल्ला करत नाही, तो आमच्यासाठी लक्ष्य नाही.”
फिदान यांनी करारातील परस्पर संरक्षणाच्या तरतुदीची तुलना नाटोच्या आर्टिकल-5 शी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तांत्रिकदृष्ट्या ही तरतूद नाटोच्या सामूहिक संरक्षणाच्या तत्त्वासारखीच आहे. या तत्त्वानुसार, एका सदस्य देशावर झालेला हल्ला हा सर्व सदस्य देशांवर झालेला हल्ला मानला जातो.
फिदान यांच्या मते, तिन्हीपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाल्यास संबंधित देशाला औपचारिकरित्या मदतीची मागणी करावी लागेल. त्यानंतर उर्वरित दोन देश धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, लॉजिस्टिक मदत किंवा गरज भासल्यास लष्करी दल तैनात करण्यासारखी पावले उचलू शकतात.
मदतीचे स्वरूप धोक्याच्या पातळीवर अवलंबून असेल आणि त्याबाबत अनेक स्तरांवर निर्णय घेतला जाईल, असेही फिदान यांनी स्पष्ट केले.
तुर्कियेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असेही सांगितले की, काही इतर देशांनी या करारात सहभागी होण्यास स्वारस्य दाखवले आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही देशाचे नाव जाहीर केले नाही.फिदान यांनी इजिप्तला या आघाडीचा नैसर्गिक भागीदार असल्याचे सांगत, पुढील टप्प्यात इजिप्तही या कराराचा हिस्सा बनू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode