
तेहरान, 09 ऑगस्ट (हिं.स.)।इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच त्यांचा कथित नवा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, इराणच्या अर्ध-सरकारी वृत्तसंस्थेने तारीख नसलेला एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये मोजतबा खामेनेई प्रकृतीने ठणठणीत दिसत असून ते काही लोकांसोबत बसून संवाद साधताना दिसत आहेत.
मोजतबा खामेनेई यांचा हा व्हिडिओ प्रथमच सरकारशी संबंधित अर्ध-सरकारी इराणी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे.मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या व्हिडिओची सत्यता स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मोजतबा खामेनेईच आहे, याचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.यापूर्वी शुक्रवारी इस्रायली माध्यमांनी खामेनेई यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे वृत्त दिले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबरोबरच ते नेमके कुठे आहेत, याबाबतच्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना आणखी उधाण आले.
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर काही काळाने मोजतबा खामेनेई यांनी सर्वोच्च नेत्याचे पद स्वीकारले होते. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर ते सार्वजनिकपणे समोर आलेले नाहीत. ते केवळ लिखित निवेदनांद्वारे आपले संदेश देत आहेत.
मिळालेल्या वृत्तांनुसार, या हल्ल्यांमध्ये मोजतबा खामेनेई जखमी झाले होते. त्यानंतर इराणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांना मध्यस्थांवर अवलंबून राहावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनीही या अनिश्चिततेत भर घातली आहे. सरकारी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सध्या खामेनेई यांच्याशी थेट संपर्क साधणे अत्यंत कठीण असल्याचे म्हटले.
जुलैमध्ये सौदी अरेबियातील वृत्तसंस्थेने इस्रायली सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने मोजतबा खामेनेई इराणमध्ये नसल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इराणच्या सर्वोच्च लष्करी नेतृत्वाचा खात्मा झाल्याचा दावा केला होता. लष्करी कारवाईनंतर खामेनेई ९० टक्के उद्ध्वस्त झाले असून ते काम करण्याच्या स्थितीत नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते.
दरम्यान, इराणच्या सरकारी अधिकाऱ्यांनी मोजतबा खामेनेई यांच्या दुखापतींची तीव्रता कमी असल्याचे सांगितले आहे. त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ते महत्त्वाच्या निर्णयांवर देखरेख ठेवत असून आवश्यक निर्देश देत असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.मात्र, ते सार्वजनिकपणे समोर न आल्याने आणि थेट संवाद साधत नसल्याने इराणमध्ये तसेच परदेशात त्यांच्या प्रकृतीबाबत आणि देशाचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पाश्चिमात्य देशांतील तसेच विरोधी गटांशी संबंधित सूत्रांनी मोजतबा खामेनेई यांना गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर ते संवाद साधण्यासाठी लिखित निवेदने आणि मध्यस्थांवर अवलंबून असल्याचेही या सूत्रांचे म्हणणे आहे.वृत्तानुसार, यापूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांना तेहरानमधील एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले होते. तेथे त्यांची भेट सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई असल्याचे सांगण्यात आलेल्या एका व्यक्तीशी करून देण्यात आली.या भेटीच्या वृत्तामुळे इराणच्या नव्या नेतृत्वाभोवती असलेल्या गुप्ततेबाबत आणखी प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी तो मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. यातील अनेक अकाउंट्सनी दावा केला आहे की हा मोजतबा खामेनेई यांचा जुना व्हिडिओ आहे. इराणच्या सरकारी समर्थन असलेल्या माध्यमांनी त्यांच्या प्रकृतीबाबत लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode