
इस्लामाबाद, 09 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्लामाबादमधील एका मशिदीत लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ कॅडरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ कॅडर कारी सईद अब्दुल अजीज याचा इस्लामाबादमधील क्यूबा मशिदीत मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारी सईदने एका अज्ञात ठिकाणी जेवण केले होते. त्यानंतर तो नमाज अदा करण्यासाठी मशिदीत पोहोचला. मात्र, मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच कारी सईद अब्दुल अजीज अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. कारी सईद हा लष्कर-ए-तैयबाच्या अशा विभागाची जबाबदारी सांभाळत होता, जो जम्मू-काश्मीरमध्ये चकमकींमध्ये ठार झालेल्या लष्करच्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधणे आणि त्यांना मदत करण्याचे काम करत होता.मात्र, कारी सईद अब्दुल अजीजच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या मृत्यूमुळे लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांमध्ये खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वीही अलीकडेच लष्कर-ए-तैयबाच्या एका कमांडरची धक्कादायक कबुली समोर आली होती. या कमांडरने दावा केला होता की, गेल्या 3 ते 4 वर्षांत ‘अज्ञात बंदूकधाऱ्यांनी’ 30 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लष्कर-ए-तैयबाचा कमांडर हनीफ असे म्हणताना ऐकू येत होता की, भारताच्या गुप्तचर संस्थांनी त्यांना ‘आझाद काश्मीर’मध्येही शांततेत राहू दिले नाही. त्याने दावा केला की, भारताच्या गुप्तचर संस्थांनी आपल्या अजेंड्यानुसार त्यांना ठार केले. हनीफच्या म्हणण्यानुसार, गेल्या 3 ते 4 वर्षांत अशा 30 हून अधिक घटना घडल्या आहेत.हनीफने पुढे सांगितले की, काही दहशतवादी पेशावरमध्ये, काही रावळपिंडीमध्ये, काही कराचीमध्ये, काही मुजफ्फराबादमध्ये, तर काही रावळकोटमध्ये ठार झाले. त्यांचा गुन्हा काय होता? त्यांचा एकमेव ‘दोष’ असा होता की ते अल्लावर विश्वास ठेवत होते, असा दावा त्याने केला.
लष्कर-ए-तैयबा ही पाकिस्तानमधील प्रतिबंधित इस्लामी दहशतवादी संघटना आहे. 1980 च्या दशकाच्या अखेरीस हाफिज मुहम्मद सईद आणि अब्दुल्ला आझम यांनी या संघटनेची स्थापना केल्याचे सांगितले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणणे आणि भारताविरोधात हिंसक कारवाया करणे हा या संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे मानले जाते. भारतात झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा सहभाग राहिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode