
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट (हिं.स.)थायलंडमधील फुकेटहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मंगळवारी (४ ऑगस्ट) तीव्र हवामानाचा सामना करावा लागला. दिल्लीत आगमन झाल्यावर, विमानाच्या पायलटची डोप चाचणी करण्यात आली.कॅप्टनची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे. पण, एअर इंडियाच्या प्रवक्त्याने अद्याप या प्रकरणाला दुजोरा दिलेला नाही.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. पायलट डोपसाठी पॉझिटिव्ह आढळल्याची पुष्टी किंवा खंडन एअरलाइनने केले नाही. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्थापित नियमांनुसार, विमान उतरल्यानंतर पायलटांची उड्डाणोत्तर तपासणी चाचणी केली जाते. पण, चाचणीचे निकाल अद्याप एअरलाइनला कळवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, एअर इंडिया सध्या कोणत्याही निष्कर्षांवर भाष्य करण्याच्या स्थितीत नाही.
प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, एअर इंडिया नागरी विमान वाहतूक नियमांनुसार क्रू सदस्यांच्या नियमित डोपिंग चाचण्या घेते. या चाचण्या कोणत्याही विशिष्ट उड्डाण किंवा परिचालन घटनेचा विचार न करता स्वतंत्रपणे घेतल्या जातात. एअरलाइनने म्हटले आहे की, आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यांसोबत सहकार्य सुरू ठेवले जाईल.
फ्लाइट क्रमांक एआय-२३७९ मंगळवारी (४ ऑगस्ट) सकाळी ८:४१ वाजता १३४ प्रवाशांना घेऊन फुकेतहून दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीत उतरल्यानंतर सुमारे दीड तासाने, विमान हवेत असताना त्याला तीव्र हवेच्या झोतांचा सामना करावा लागला. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, विमान सुमारे दोन ते तीन मिनिटे जोरदार धक्क्यांनी हेलकावे खात होते. हे धक्के इतके तीव्र होते की केबिनच्या छताचे नुकसान झाले.
सध्याच्या नियमांनुसार, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित क्रू सदस्यांना उड्डाण कर्तव्यावरून दूर ठेवण्यात आले आहे. त्याच नियमांनुसार या विमानाच्या वैमानिकांनाही उड्डाण करण्यापासून थांबवण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे