
अमरावती, 01 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा भोंगळ कारभार आणि संबंधित कंत्राटदारांच्या मनमानीमुळे प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांचा संयम अखेर सुटला आहे. परिसरातील कचरा उचलला जात नसल्याने आणि नियमित स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येबाबत प्रशासनाकडे तब्बल १३ वेळा नगरसेवक चंदू खेडकर यांनी पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन थेट महापालिका कार्यालयातच कचरा आणून ओतण्याचा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील विविध भागांमध्ये स्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून, नियमित कचरा संकलन होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाढत्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. मात्र, या सर्व परिस्थितीकडे स्वच्छता विभाग आणि संबंधित कंत्राटदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा संतप्त आरोप करण्यात येत आहे.
या समस्येच्या निराकरणासाठी नागरिकांनी आणि संबंधितांनी प्रशासनाला तब्बल १३ पत्रे व निवेदने दिली. प्रत्येक वेळी स्वच्छतेची स्थिती सुधारण्याची मागणी करण्यात आली. मात्र, ही सर्व पत्रे केवळ कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात एकाही तक्रारीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने नागरिकांमध्ये आता प्रशासनाविरोधात रोष वाढला आहे. स्वच्छता विभाग आणि कंत्राटदारांमधील समन्वयाचा अभाव, कर्मचाऱ्यांची अनियमितता आणि तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यामुळे प्रभागातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नावर प्रशासनाकडून अशी उदासीन भूमिका घेतली जात असल्याने संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढेही कचरा उचलण्यासह स्वच्छतेची व्यवस्था सुरळीत करण्यात आली नाही आणि कंत्राटदारांची मनमानी थांबली नाही, तर प्रभागातील नागरिकांना एकत्र घेऊन महापालिका कार्यालयातच कचरा आणून टाकण्यात येईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १ मधील स्वच्छतेचा प्रश्न आता केवळ तक्रारींपुरता मर्यादित न राहता आंदोलनाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.आता १३ पत्रांकडे दुर्लक्ष करणारे महापालिका प्रशासन नागरिकांच्या या आक्रमक इशाऱ्यानंतर तरी जागे होणार का आणि स्वच्छता विभाग तसेच संबंधित कंत्राटदारांवर कोणती ठोस कारवाई करणार, याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी